पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बोईसरमध्ये रक्तदान व आरोग्य शिबिर संपन्न! संजय पाटील यांच्या पुढाकारातून समाजसेवेचा आदर्श
बोईसर : महाराष्ट्राचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ हार-तुरे अथवा औपचारिक स्वागतावर भर न देता, थेट जनसेवेचा वसा जपणारा स्तुत्य उपक्रम बोईसर येथे पार पडला. स्थानिक डॉन बॉस्को शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराला कामगार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीची साडेतीन दशकांची परंपरा अधिक दृढ केली.
शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या उपक्रमात विविध क्षेत्रांतील घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विशेषतः स्थानिक कामगार संघटना, रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनांच्या पदाधिकार्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन झाले. आपत्कालीन परिस्थिती आणि शस्त्रक्रियांच्या वेळी रक्तपेढ्यांमधील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी हे शिबिर अत्यंत दिलासादायक ठरले आहे. यापूर्वी जागतिक महामारीच्या अत्यंत कठीण काळातही अविरत शिबिरे राबवून गरजूंना जीवनदान देण्याचे काम या फळीने केले होते, त्याचीच प्रचिती या वेळीही आली.
यंदाच्या शिबिराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ रक्तदानापुरते मर्यादित न राहता सर्वसमावेशक आरोग्यसेवेची सांगड घालण्यात आली. स्वारोग्य होमिओपॅथी रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणीचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. प्रामुख्याने महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष पुरवत स्तन कर्करोग तपासणी, स्वच्छता विषयक मार्गदर्शन आणि सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात आले.
आपल्या लाडक्या लोकनेत्याचा वाढदिवस हा केवळ राजकीय सोहळा न ठरता तो थेट दुर्लक्षित घटकांच्या आरोग्याशी आणि जीवनरक्षणाशी जोडला जावा, हा या आयोजनामागील मूळ हेतू यशस्वी ठरला. एका बाजूला रक्ताचा प्रत्येक थेंब गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी समर्पित करताना, दुसर्या बाजूला महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती घडवून आणत बोईसरकरांनी पालकमंत्री गणेश नाईक यांना दिलेली ही वाढदिवसाची अनोखी आणि प्रेरणादायी सामाजिक भेट ठरली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा