रासरंग दांडिया उत्सव 2026ची रंगत वाढणार; युवा फाउंडेशनचा सर्वांसाठी मोफत गरबा; मराठी कलाकार लावणार हजेरी

 


बोईसर : नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला सामाजिक बांधिलकीची जोड देत युवा फाउंडेशन, बोईसरच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या ‘रासरंग दांडिया उत्सव 2026 ची माहिती देण्यासाठी सरोवर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांनाही गरब्याचा आनंद घेता यावा, या उद्देशाने मोफत रासरंग गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या पत्रकार परिषदेला कार्यक्रमाचे अध्यक्ष तुषार संखे, कार्याध्यक्ष मुकेश पाटील यांच्यासह भरत राजपूत, वसंत चव्हाण, संतोष मराठे, प्रशांत संखे, चंदन शिंग, वैदेही वाढण, चांदणे, सुशील चूरी, अंकुर राऊळ, संदीप घरत, प्रितेश संखे, महेंद्र भोणे, चिराग राणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सविस्तर माहिती रुपेश (सौरभ आप्पा) यांनी दिली. यावेळी वसंत चव्हाण यांनी ‘रासरंग’ गरबा उत्सवामागील संकल्पना आणि आयोजनाबाबत माहिती दिली. तर संतोष मराठे यांनी सर्वसामान्यांसाठी मोफत रासरंग गरबा आयोजित केल्याबद्दल युवा फाउंडेशनचे कौतुक केले. आजवर अनेक ठिकाणी गरबा उत्सव होत असले तरी सर्वांसाठी विनामूल्य गरब्याचे आयोजन करण्याचा हा उपक्रम विशेष असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘गरबा सर्वांचा, आनंद सर्वांचा’ या भावनेतून आयोजित करण्यात येणार्‍या या उपक्रमामुळे आर्थिक परिस्थितीचा विचार न करता प्रत्येकाला गरब्याच्या उत्सवात सहभागी होता येणार आहे. त्यामुळे बोईसर परिसरातील गरबा रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

यावेळी भरत राजपूत यांनी गरबा उत्सवाच्या आयोजनासंदर्भात महत्त्वाच्या सूचना मांडल्या. उत्सवासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या परवानग्या वेळेत घेण्यात याव्यात, तसेच गरबा रसिकांना कार्यक्रमस्थळी कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही, याची आयोजकांनी काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. सर्वांसाठी मोफत कार्यक्रम ठेवण्याच्या निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले.

दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौरभ आप्पा यांनी केले. युवा फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे बोईसरमध्ये नवरात्रोत्सवाला सामाजिक सहभागाची आणि सर्वसमावेशक उत्सवाची नवी रंगत मिळणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बोईसरमध्ये शिवशंभु चालक-मालक संघटनेचा दिमाखात शुभारंभ

कोळगाव ग्रामसचिवालय इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न!

पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने फुलाचा पाडा शाळेत शालेय साहित्य वाटप, कपाट भेट व वृक्षारोपण संपन्न!