महाराष्ट्राप्रमाणे केंद्रातही ३३ जातींना मिळावे ओबीसी आरक्षण, अन्यथा आगामी निवडणुकीत भोगावे लागतील गंभीर परिणाम: श्रावण फरकाडे यांचा इशारा!

 

उरण : महाराष्ट्र राज्यात ३३ जातींना ओबीसी (इतर मागासवर्गीय) आरक्षण लागू आहे; मात्र याच ३३ जातींना केंद्र स्तरावर हे आरक्षण मिळत नाही. यामुळे केंद्रीय यादीतून वंचित राहिलेल्या या ३३ जातींचे मोठे आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून 'ओबीसी महाराष्ट्र कृती समिती'च्या माध्यमातून या ३३ जातींना महाराष्ट्र राज्याच्या धर्तीवर केंद्र सरकारकडूनही ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी कायदेशीर आणि शांततापूर्ण मार्गाने सातत्याने लढा सुरू आहे. शासन-प्रशासनाशी सातत्याने पत्रव्यवहार केला जात असून सर्वपक्षीय मंत्री, खासदार आणि आमदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीही घेण्यात आल्या आहेत. परंतु, दीर्घकाळापासून ही गंभीर समस्या सुटली नसल्यामुळे आता हा लढा निर्णायक वळणावर पोहोचला आहे. ओबीसी महाराष्ट्र कृती समितीच्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तीव्र आंदोलन छेडले जाईल, ज्याच्या परिणामांना शासन पूर्णपणे जबाबदार राहील, असा आक्रमक इशारा ओबीसी महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष श्रावण फरकाडे यांनी उरण येथे आयोजित सभेत दिला.

महाराष्ट्रातील ३३ ओबीसी जाती व समाजघटकांचा केंद्र सरकारच्या केंद्रीय ओबीसी यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या 'ओबीसी महाराष्ट्र कृती समिती'ची कार्यकारिणी बैठक रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी आनंदी हॉटेल, कोटनाका-उरण, जि. रायगड येथे कराडी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या वेळी आपले विचार मांडताना अध्यक्ष श्रावण फरकाडे म्हणाले की, जर न्याय मिळाला नाही तर वेळ पडल्यास तीव्र लढा उभारला जाईल, ज्यासाठी सर्व ३३ जातींनी एकत्र येऊन संयुक्त संघर्ष उभा करणे आवश्यक आहे. या प्रसंगी व्यासपीठावर अंबाला लोकसभा (हरियाणा) मतदारसंघाचे माजी खासदार अमन कुमार नागरा, भाजप कार्यकर्त्या नवी दिल्ली - पुष्पाजी नागरा, ओबीसी महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष श्रावण फरकाडे, कार्याध्यक्ष राम खरपूरिया लोधी, सचिव दीपक नेवे, संरक्षक नामदेव राऊत, माजी प्राचार्य पी. आर. बडगुजर, लेवे गुजर समाजाचे जी. एम. पाटील, प्रा. शालिक नेवारे, ॲड. मदन गोवारी, अशाद शेख, मकसूद शेख, गुल मोहम्मद खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत महाराष्ट्रातील संबंधित ओबीसी घटकांना केंद्र सरकारच्या ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. केंद्र व राज्य शासनाला दिलेली निवेदने, बैठका, पत्रव्यवहार आणि पुढील दिशा यावर विस्तृत चर्चा झाली. विशेषतः केंद्रीय ओबीसी यादीतील समावेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रभावी पाठपुरावा करणे आणि या विषयावर विविध ओबीसी समाज संघटनांमध्ये व्यापक जनजागृती घडवून आणण्यासाठी भावी रणनीती आखण्यात आली. महाराष्ट्र ओबीसी कृती समितीच्या वतीने या मागणीसाठी दिल्ली आणि महाराष्ट्रात विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. संबंधित समाजांना केंद्र सरकारच्या शैक्षणिक प्रवेश, केंद्रीय सरकारी नोकऱ्या, शिष्यवृत्ती आणि इतर केंद्रस्तरीय योजनांमधील ओबीसी सवलतींचा पूर्ण लाभ मिळावा, हाच या सर्व प्रयत्नांचा मुख्य उद्देश असल्याचे श्रावण फरकाडे यांनी स्पष्ट केले.

माजी खासदार अमन कुमार नागरा यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपण पूर्णपणे ओबीसी समाजाच्या पाठीशी ठाम उभे राहून सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली; तसेच दिल्लीत संबंधित मंत्री आणि खात्यांच्या सचिवांसोबत बैठक घडवून आणून या प्रश्नांवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. या वेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यकारिणी बैठकीसाठी महाराष्ट्रातील विविध ओबीसी समाजाचे प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यादरम्यान कराडी समाजाच्या वतीने भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. बैठकीच्या उत्तम नियोजनाबद्दल व यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी केले.

ही महत्त्वाची बैठक यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र अध्यक्ष महादेव बंडा, सचिव विलास पाटील, माजी अध्यक्ष ॲड. मदन गोवारी, पनवेल तालुका अध्यक्ष सूरदास गोवारी, खजिनदार मधुकर भगत, सहखजिनदार प्रल्हाद कासकर, पनवेल सचिव शिवदास पाटील, उरण अध्यक्ष रमण कासकर, सल्लागार शंकर भोईर, सभापती गणेश पाटील, सदस्य नरेश भोईर, हरिश्चंद्र पाटील, सुनील पाटील, आनंदी हॉटेलचे संचालक चेतन भोईर तसेच कराडी समाज संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बोईसरमध्ये शिवशंभु चालक-मालक संघटनेचा दिमाखात शुभारंभ

कोळगाव ग्रामसचिवालय इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न!

पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने फुलाचा पाडा शाळेत शालेय साहित्य वाटप, कपाट भेट व वृक्षारोपण संपन्न!